राज्य शासनाने दोन गावांसाठी काढली स्वतंत्र अधिसूचना, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीतून वगळण्याचा निर्णय…
NEWS PRAHAR ( पुणे ) : बहुचर्चीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसाठी एक स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा अखेर राज्य शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या दोन गावांना पुणे महापालिका हद्दीतून वगळण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन केली जाणार आहेत. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे २०१७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने आणि कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रार करत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुसार यावर राज्य सरकारकडून विचार करण्यात येत होता.
लोकसंख्येनुसार ‘ब’ वर्ग नगरपालिका करता येऊ शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यामुळे आता या दोन गावांबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात गेला असून, त्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. न्यायालयात सरकारने ही दोन गावे महापालिकेत असल्याचेही प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे या गावांमध्ये विकास कामे ही महापालिकेकडूनच केली जात होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी फुरसुंगी, उरुळी देवाची ही गावे महापालिका हद्दीत वगळण्याचे आणि या दोन गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते. महिनाभराच्या मुदतीत जिल्हा प्रशासनाकडे साडेचार हजारांहून अधिक हरकती-सूचना प्राप्त झाल्या होत्या.
महापालिकेकडून तातडीने विकास आराखडा होऊ शकतो. महापालिकेने या गावांमध्ये नगररचना योजना जाहीर केली आहे. ती रद्द होऊ शकते. त्यामुळे ही गावे महापालिकेच्या हद्दीतच ठेवावीत, अशी बाजू २ हजारांहून अधिक नागरिकांनी मांडली होती. स्वतंत्र नगरपालिकाही या हद्दीचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करू शकते. विकासकामांसाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र निधी मिळू शकतो. चांगले प्रशासन देता येऊ शकते, त्यामुळे या दोन्ही गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, असे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन २ हजार ३०० हून अधिक नागरिकांनी केले होते. त्यावर जिल्हा प्रशासनाकडून या दोन्ही गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता.
गावांची लोकसंख्याब :
दोन्ही गावांची मिळून एकूण लोकसंख्या : ७५ हजार ४०५
फुरसुंगी गावची लोकसंख्या : ६६ हजार २
उरुळी देवाची गावची लोकसंख्या : ९ हजार ४०३
‘ब’ वर्ग नगरपालिकेसाठी लोकसंख्येसाठीची अट : ७५ हजार
निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार :
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राजकीय ठरणार आहे. या निर्णयाविरुद्ध या गावांतील काही नागरिक पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. दोन्ही गावांचा समावेश महापालिकेतच असावा, अशी त्यांची मागणी आहे.