अहिल्यानगर | प्रतिनिधी : दिल्लीतील CJP ( कॅाकरोच जनता पार्टी ) आणि NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर येथे मौन आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि सरकारने त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान कोणतेही भाषण न करता मौन धारण करून विद्यार्थ्यांप्रती एकात्मता व्यक्त केली. त्यांनी सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधावा, त्यांच्या समस्या ऐकून योग्य तो मार्ग काढावा, असे आवाहन केले.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांकडून समर्थन व्यक्त केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगरमध्ये हे मौन आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
अण्णा हजारे यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, सरकार आणि आंदोलक यांच्यात सकारात्मक संवाद होणे हीच परिस्थितीतून मार्ग काढण्याची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे राज्यासह देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
