Newsprahar

हडपसरमधील मंत्री मार्केट व हडपसर गाव वेस परिसरातील वाढत्या वाहतूक समस्येची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची चर्चा…

हडपसर | प्रतिनिधी : हडपसरमधील मंत्री मार्केट आणि हडपसर गाव वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मारुती (आबा) तुपे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वाहतुकीचा प्रश्न हा केवळ रस्त्यापुरता मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याचे सांगत, तातडीच्या उपायांसह दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात आला. परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करून नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी विविध पर्यायांचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीदरम्यान ट्रॅफिक विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा केली.

नगरसेवक मारुती (आबा) तुपे यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी करण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले. हडपसर परिसरातील वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनीही व्यक्त केली.