पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात वितरण…
NEWS PRAHAR ( पुणे ) दि : १८ फेब्रुवारी : चास अहिल्यानगर साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था संचलित आडसूळ टेक्निकल कॅम्पसला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालय या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे . मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रुपये 3 लाख, स्मृतीचिन्ह आणि गौरव पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाच्या पुरस्कारासाठी आडसूळ टेक्निकल कॅम्पसने विद्यापीठाकडे आपला प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार विद्यापीठांच्या तज्ञ समितीने डिसेंबरमध्ये महाविद्यालयाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. अखेर निवड प्रक्रियेतील सर्व निकषांमध्ये अग्रेसर ठरल्याने ग्रामीण भागातील व्यावसायिक अभ्यासक्रम गटातून आडसूळ टेक्निकल कॅम्पसला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर करण्यात आला होता.
मंगळवार, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे शुभ हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिरुद्ध आडसूळ, संस्थेच्या सिक्रेटरी सौ लीना आडसूळ, संस्थेचे श्रद्धास्थान श्री माणिक आडसूळ(दादा), सौ. सुंदरबाई आडसूळ (बाई), डायरेक्टर श्री कृष्णा आडसूळ, सौ. पायल आडसूळ, प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संभाजी पठारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप एम पाटील यांनी आपल्या मनोगतातून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथमतः संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, पालक तसेच माजी विद्यार्थी यांनी दिलेल्या निस्वार्थ योगदानामुळे हा पुरस्कार प्राप्त झालेला असून त्याचे श्रेय सर्वांना दिले. त्याचबरोबर, या पुरस्कारामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांची, शिक्षकांची गुणवत्ता वाढवून त्याचा फायदा नक्कीच त्यांच्या भविष्यातील जडण घडणीसाठी होईल, असे त्यांनी सांगितले. सदर पुरस्कार प्राप्तीमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
डॉ. संभाजी पठारे, यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हा पुरस्कार आडसूळ टेक्निकल कॅम्पसने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच पटकावला असे सांगून, आपल्या महाविद्यालयाचे नाव आता मोजक्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत समाविष्ट झाले असल्याचे नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री अनिरुद्ध आडसूळ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या आडसूळ टेक्निकल कॅम्पसला मिळालेला हा पुरस्कार मानाचा तुरा आहे असे प्रतिपादन करून पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल विद्यापीठाला धन्यवाद दिले. तसेच प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप एम पाटील यांचा संस्थेच्या वतीने त्यांनी शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव पूर्ण सन्मान केला.
त्याचबरोबर सौ. कविता पानसरे अनंत विद्यालय, आडसूळ एज्युकेशनल कॅम्पस मधील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याकडूनही प्राचार्य व संचालक डॉ. प्रदीप एम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सदरच्या पुरस्कारामुळे महाविद्यालयामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांच्या तना मना मध्ये सर्वत्र आनंद दरवळत असून अडसूळ शैक्षणिक संकुलात नवचैतन्य अनुभवास येत आहे.