वाघोली, पुणे : पुणे पोलिसांच्या मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत झोन ७ मधील वाघोली पोलिसांनी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आय.व्ही. इस्टेट रोड, ऑर्चिड साई प्रॉपर्टीज, वाघोली परिसरात सापळा रचून पोलिसांनी सूरज पद्माकर भुते (वय १९) आणि आकाश गणेश धनवटे (वय १९) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून TERMIVA नावाच्या ३० मिली क्षमतेच्या १०० इंजेक्शनच्या बाटल्या तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकीचा जप्त करण्यात आल्या. प्राथमिक तपासात ही इंजेक्शने नशेसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून या इंजेक्शनचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
मिशन क्रॅकडाऊन अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईमुळे वाघोली परिसरातील बेकायदेशीर नशेच्या व्यवहारांवर पोलिसांनी मोठा आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.