NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ०४ मे : हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी येथील भोगवटा वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित जमिनीचे हस्तांतर सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येत नसताना, नियमांना बगल देत बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणात प्रभारी म्हणून कार्यरत असलेले स्वप्निल मेंगाणे यांनी काही संबंधित व्यक्तींशी संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलमुखत्यारपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या दस्तामध्ये चुकीच्या चतु:सीमा नमूद करण्यात आल्याचे तसेच ताबा वहिवाट देणे शक्य नसतानाही बनावट स्वरूपाचा दस्त तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच, मुद्रांक शुल्कात फेरबदल करून कमी शुल्क भरत शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. भोगवटा वर्ग २ जमिनीबाबत बक्षीसपत्र, खरेदीखत किंवा ताबा साठेखत सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करता येत नसतानाही व्यवहार नोंदवण्यात आल्यामुळे महसूल व नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे.
या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व सहभागी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
