Newsprahar

खेड परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; पोलिसांची कारवाई कुचकामी…?

खेड शिरवली रोडवर जुगाराचा ‘क्लब’ जोमात; पोलीस कर्मचारी घोलप यांच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप…

NEWS PRAHAR ( खेड )  दि : १०  मे : खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड-शिरवली रस्त्याजवळ असलेल्या बेडांले यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पत्त्यांचा जुगार पुन्हा एकदा नव्याने सुरू झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पोलीस प्रशासनाकडून अधूनमधून कारवाईच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ आणि पैशांची उलाढाल….

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोल्ट्री परिसरात रात्री उशिरापर्यंत आलिशान वाहनांची वर्दळ असते. संशयास्पद हालचाली आणि लाखो रुपयांची उलाढाल येथे दररोज सुरू असते. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने, या बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांचाच मूक आशीर्वाद असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

पोलीस अधिकारी घोलप यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…?

“सामान्यांवर किरकोळ कारणावरून झटपट कारवाई करणाऱ्या पोलिसांना हे मोठे जुगार अड्डे दिसत नाहीत का?” असा सवाल नागरिक करत आहेत. या प्रकरणावरून पोलीस ठाण्यातील साहेबांचे विशेष प्रेम असलेल्या घोलप यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले जात आहेत. “वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात ओले झाले की कारवाई थंडावते,” अशी चर्चा सध्या परिसरात असून, काही प्रभावशाली व्यक्तींच्या आडोशाने हा जुगार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

तरुण पिढी धोक्यात; निष्पक्ष चौकशीची मागणी….!

या जुगार अड्ड्यांमुळे परिसरातील शांतता धोक्यात आली असून, गावातील तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त होत आहे. केवळ कागदोपत्री धाडी दाखवून जुगार बंद होणार नाही, तर यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. दोषींवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी खेड तालुक्यातील नागरिकांकडून जोर धरत आहे.

तरुणाई भरकटली; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…?

कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीत जास्त पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी स्थानिक तरुणाई या अवैध धंद्यांकडे आकर्षित होत आहे. पोलिसांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, “पोलिसांनीच या धंद्यांना ‘एनओसी’ दिली आहे की काय?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

कारवाईचा केवळ फार्स…?

अवैध धंद्यांवर अधूनमधून कारवाई होते, पण काही दिवसांतच हे व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरू होतात. “पोलिस नेमक्या कोणत्या कारणामुळे गप्प आहेत, हे समजण्याइतपत नागरिक अज्ञानी नाहीत,” अशा शब्दांत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता ‘स्टंटबाजी’ न करता ठोस आणि कायमस्वरूपी कडक कारवाई करावी, अशी मागणी खेड तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.