Newsprahar

जेजुरी परिसरातील अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा ना धाक ना दरारा …..

News Prahar सुचिता भोसले ( पुणे ) : जेजुरी परीसर अवैध धंदे चालकांचे माहेरघर झाले असुन बिनदिक्कतपणे मटका, चक्री,गांजा, स्वारेट ,लॅाज वरील वेश्याव्यवसाय  व पत्यांचे क्लब चालू असल्याने जेजुरी देवस्थान परीसरात पोलीसांचा धाक राहीला आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनकडून उपस्थित होत आहे. जेजुरी परिसरात मागील काहि दिवसांपासून अवैध धंद्याने चांगलेच डोके वर काढले आहे.

कहर म्हणजे या भागामध्ये सर्रास मटका चालक खुलेआमपणे चिट्टी देऊन मटका घेत असल्याने नेमकं या अवैध धंद्यांना अभय आहे तरी कोणाचे अशी चर्चा सामान्य नागरिक करत आहेत. या भागामध्ये अवैध दारू विक्री , पत्त्यांचे क्लब, गांजा विक्री, बिंगो , वेश्याव्यवसाय, गोवा गुटखा विक्री व मटका जुगार बुकीच पेव फुटलं आहे. घरातील  मुलांपासून मोठ्या व्यक्तीं या जुगार व व्यसनांच्या आहारी जात असल्याने गावागावात कलह व सामान्य लोकांचे कुटुंब उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जेजुरी परिसरा मध्ये सर्रासपणे चिट्टी देऊन मटका जुगार चालू असल्याचे चित्र न्युज प्रहार च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता दिसून आले. ग्रामीण भागामध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिबंधित असणारा गुटखा ही पान टपऱ्या व किराणा दुकानांमध्ये उपलब्ध झाला असुन याचे व्यसनही लहान शाळकरी मुलांपर्यंत पोहोचले आहे. जेजुरी पोलीस प्रशासनाची वचक अवैध धंदे चालकावर राहिला नसल्याने ते बिंदिकतपणे हा व्यवसाय चालवत असल्याचे चित्र असून प्रशासनाने वेळीच या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मटका चालविताना पोलिसांची कोणतीही भीती अथवा कारवाईची धास्ती नसते. पोलिसांच्या असलेले अर्थपूर्ण सहकार्य या अवैध धंदेवाल्यांना पाठीशी तर घालत नाही ना ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनमध्ये उपस्थित होत आहे, विशेष म्हणजे दिवसभर या मटका बुकिंगवर गर्दी असते. काही दिवसांपूर्वी चोरून लपवून खेळल्या जाणार हा मटका आता मात्र खुलेआम सुरू आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत या मटका बुकी चालतात. ओपन, क्लोज अशा दोन्ही वेळेला या भागात नागरिकांची गर्दी पहावयास मिळते. जेजुरी परिसरात खुलेआम मटका सुरू असल्याने मटका खेळणाऱ्यांची संख्या ही वाढत चालली आहे. अवैध व्यवसायावर पोलीस प्रशासनाचे होत असलेल दुर्लक्ष या व्यवसायांना बळ देते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी जेजुरी परिसरातील अवैध व्यवसायांवर अनेकदा कारवाई करण्यात आली, काही ठिकाणी ठोस पावलेही उचलली जातात मात्र, कारवाईत सातत्याची गरज आहे. तरच अशा अवैध व्यवसायांना आळा बसणार आहे का? जेजुरी परिसरातील अवैध्य व्यवसायांवर पोलिसांनी कडक कारवाई करून अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत,असे देखील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.