Newsprahar

आकाच्या आशीर्वादाने अवैध धंदे जोरात….

News Prahar  सूचिता भोसले ( पुणे ) : सासवड परिसरात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट माजला आहे. पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे सारे धंदे थेट चौक, रस्ते, शाळा अशा दर्शनीय भागात हातपाय पसरू लागले आहेत.त्यामुळे अनेक कुटुंबे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेळोवेळी तक्रार करूनही त्याबाबत कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिस प्रशासनाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. सासवड परिसरात सुरू असणाऱ्या अवैद्य धंदे वाल्यांचा आका आहे तरी कोण? असा प्रश्न सध्या परिसरातील नागरिक करत आहेत. वारंवार बातम्या होऊनही अवैध धंदे जोरदारपणे सुरू आहेत. अवैध धंद्यान विरुद्ध कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. सासवड परीसरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवाह वाढल्याची माहिती समोर येत आहे.

 

सासवड पोलिसांनी यावर लक्ष केंद्रित करावे असे देखील स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे परंतु सदर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हे अवैध धंदे बंद करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करतात परंतु यांचा आका त्यांना हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी लाखो रुपयांची माया दर महिण्याला गोळा करून देण्यात यशस्वी होताना दिसत आहे . त्यामुळे सासवड परिसरात “आका” आणि “बोका” यांची टफ फाईट सुरू आहे.त्यामुळे सासवड परिसरातील नागरिक अवैध धंदेवाल्यांमूळे बेजार झालेचे चित्र आहे. सामान्य नागरीकांनी दाद मागायची तर कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. त्यामुळे सध्या मात्र सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग फायद्यात असल्याचे चित्र दिसत आहे.

 

गावठी दारू, ताडी, गांजा जुगार मटका हुक्का पार्लर तसेच पत्यांचे क्लब, हॉटेल व ढांब्यांवरील अवैद्य पद्धतीने दारू विक्री असे सर्व धंदे कमी अधिक प्रमाणात जोरदार “आका” च्या आशिर्वादाने खुलेआम सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखा ही अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत अत्यंत नरम असल्याचे चित्र दिसत आहे. हे सर्व काही ठरवूनच सुरू आहे की काय? हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

पुणे ग्रामीण हद्दीत घडलेल्या गुन्हेगारी घटना पाहता पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु अवैद्य धंदे आणि गुन्हेगारी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.तरी देखील सासवड पोलीस स्टेशनच्या आका” वर पोलीस अधीक्षकांचे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण एका बाजूला जिल्हाभर कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारच्या अवैद्य धंद्यांचा खुला बाजार सुरू असल्याचे विदारक चित्र पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांच्या काळात दिसत आहे.धक्कादायक म्हणजे पोलीस अधीक्षक सुद्धा अवैद्य धंदे बंद करण्यासाठी असमर्थ असल्याचे चित्र समोर दिसत आहे. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होते की काय किंवा हे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात का?असा प्रश्न देखील येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या परिसरात असणाऱ्या अवैद्य धंद्यांची यादी पुढीलप्रमाणे :

१) कुंभारवाडा,विजय हॉटेल पाठीमागे सासवड
२) पी एम टी बस स्टॉप मागे
३) लुक्कड गल्ली ताडी गुप्त्यासमोर न्यू महाराष्ट्र बेकरीच्या मागे.
हे मटक्याचे धंदे जगताप आणि पैलवान यांचे आहेत या परिसरात चिव चिव ( सॉरेट) खोमणे ,शेख, माने खंडोबा नगर परिसरात चालवतात. झोपडपट्टीमध्ये जोरदारपणे गांजा व दारू विक्री होत आहे. तसेच या परिसरात क्लब चालवणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे .

गिरमे वस्ती न्यू ग्रँड मल्हार हॉटेलच्या मागे बागवान ,  कोल्हापुरे हॉटेलच्या मागे झेंडेवाडी, भिवडी सर्जा हॉटेलमध्ये वाडेकर तसेच पाटील वस्तीतच पाटील पत्त्यांचा क्लब चालवत आहेत. या ठिकाणी नाही नाही म्हणता १०/२०,२५/५०, ५०/१०० अशा पद्धतीने पत्यांचे टेबल चालू आहेत. सासवड परीसरात पत्यांचा जुगार, बेगम गांजा ( दत्त नगर  ),स्वारेट(चिव चिव),हॅाटेल ढाबा या ठिकाणी दारू विक्री तसेच गावठी दारू व मटक्याचे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे सासवड परिसरातील शांतता भंग पावत आहे. महिला व नागरिकांची कुचंबणा होत आहे. मुख्य चौक व आसपास राजरोसपणे हे धंदे आकाच्या आशिर्वादाने सुरू आहेत.

अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलिस प्रशासनाला आहे. असे असताना अवैध धंद्यावर ‘मासिक टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, “आका” च्या ताब्यात घेवून पोलिस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व‘आलबेल’ असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवु देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र सासवड परीसरात बोलले जात आहे.
यावर पुणे ग्रामीण अधीक्षक कारवाई करतील का हे पाहणे गरजेचे आहे.