Newsprahar

‘जणू जगच जिंकले’ सुनीता विलियम्स ने केला जल्लोष…

NEWS PRAHAR : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नऊ महिने वाट पहिल्यानंतर ती पृथ्वीवर परतणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचा क्रू-10 मिशन आता अंतराळ स्थानकात आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे ड्रॅगन अंतराळ यान अंतराळस्थानकात पोहोचले. यानाचे यशस्वी डॉकिंग आणि हॅच उघडल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना भेटले. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 14 मार्च रोजी प्रक्षेपित करण्यात आलेले क्रू-10 मिशन 16 मार्च रोजी आयएसएसवर पोहोचले. त्यातून चार नवीन अंतराळवीरांना पोहोचवले आणि सुनीता अन् बुच विल्मर यांचा परतीचा मार्ग मोकळा केला. 19 मार्च रोजी ते पृथ्वीवर परतणार आहे.

सर्वांनी आनंद केला साजरा…

क्रू ड्रॅगन अंतराळयान फाल्कन-9 रॉकेट वापरून स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 9.40 वाजता अंतराळस्थानकावर पोहोचले. क्रू-10 टीममध्ये अमेरिकेचे दोन अंतराळवीर ॲन मॅकक्लेलन आणि निकोल आयर्स, जपानचे अंतराळवीर तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. क्रू-10 मधून गेलेले चौघे डॉकिंगनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांना भेटले. यावेळी सुनीता आणि विल्मार यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. त्यांनी सर्वांना मिठी मारून आनंद व्यक्त केला. ते डान्स करतानाही दिसले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आता नवीन अंतराळवीरांना अंतराळ स्थानकाची माहिती देतील. त्यानंतर ते पृथ्वीवर परतणार आहे. नासाच्या माहितीनुसार, हवामानाने साथ दिली तर स्पेसएक्स कॅप्सूल बुधवारपूर्वी स्पेस स्टेशनपासून वेगळे होईल आणि फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरेल.

आठवड्यासाठी गेले अन् 9 महिने अडकले….

सुनीता आणि विल्मोर अंतराळ स्थानकावर पोहचल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात परतणार होते. पण बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. यामुळे ते 9 महिने अडकून पडले होते. आता नासा आणि स्पेसएक्सच्या या मोहिमेद्वारे त्यांचे पुनरागमन शक्य होत आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे.

सुनीता विल्यम्स हिला पृथ्वीवर परत आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: रस घेतला होता. त्यांनी ही जबाबदारी टेसलाचे मालक एलन मस्क यांना दिली होती. हे मिशन लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने काम सुरु केले. हे नासा आणि स्पेस एक्सचे संयुक्त मिशन आहे.