Newsprahar

सत्त्वपोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अवैध कचरा टाकण्याचा गंभीर प्रकार उघड…

NEWS PRAHAR सुचिता भोसले   ( पुणे ) : शहरातील नामांकित सत्त्वपोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक आणि जैविक कचऱ्याची अवैध विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, हा कचरा सरकारी गायरान जमीन, जंगल क्षेत्र तसेच मुळा-मुठा नदी आणि दहितणे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे, ज्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण..?

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीकडून दररोज १ टनाहून अधिक औद्योगिक कचरा मुळा-मुठा नदीत किंवा गायरान जमिनीत फेकला जात आहे. विशेष म्हणजे, हा कचरा मोठ्या प्रमाणात दहितणे बंधाऱ्यात साठवला जात असल्याने नदीतील पाणी दूषित होत आहे आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

या प्रकारावर काही जबाबदार नागरिकांनी व्हिडिओ पुरावे गोळा केले होते, मात्र जेव्हा हा गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

अधिकृत परवानगीशिवाय ठेकेदारांकडून कचऱ्याची विल्हेवाट..!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सध्या असलेल्या कचरा व्यवस्थापन ठेकेदारांकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नाही. याचा अर्थ बेकायदेशीररित्या कचरा टाकण्याचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

भ्रष्टाचाराचा प्रकार समोर…

जेव्हा कंपनी प्रशासनाला या बाबत माहिती दिली असता, असे निदर्शनास आले की ठेकेदार व कंपनीतील काही भ्रष्ट अधिकारी संगनमताने हा प्रकार चालू ठेवत आहेत. त्यामुळे हा प्रकार अजूनही रोखला गेलेला नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

पर्यावरणासाठी धोका…

या कचऱ्यात घातक रसायने आणि जैविक प्रदूषक घटक असल्याने ते मुळा-मुठा नदीतील पाणी, दहितणे बंधाऱ्यातील जलसाठा, जमीन आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे.

जमिनीची सुपीकता कमी होण्याचा धोका आहे…

पाण्याचा स्रोत दूषित होत असल्याने आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे.नद्यांमधील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे.

सार्वजनिक तक्रारी आणि अधिकृत कारवाईची मागणी…

या प्रकारावर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) यांच्याकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

समाधानासाठी पुढाकार घेण्याची गरज…

कंपनीला पर्यावरणपूरक आणि कायदेशीर पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी योग्य ठेकेदारांची निवड करणे आवश्यक आहे. तसेच, ज्या कंपनीला कचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला जातो, त्यांच्याकडे आवश्यक परवाने आणि कायदेशीर मंजुरी असणे गरजेचे आहे.

नागरिकांचा प्रशासनाकडे सवाल :

1. अशा कंपन्यांवर कारवाई का होत नाही?

2. मुळा-मुठा नदी आणि दहितणे बंधाऱ्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार?

3. औद्योगिक कचऱ्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येणार आहेत?

जर लवकरच कारवाई झाली नाही, तर हा प्रकार संपूर्ण परिसराच्या आरोग्यास मोठा धोका ठरू शकतो, असे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.