NEWS PRAHAR : राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा एका राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे. हा राजकीय नेता सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना या राजकीय नेत्याने हा गौप्यस्फोट केला. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
संबंधित नेत्याने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यासंबंधीच्या व्हिडीओबद्दलही त्याने भाष्य केले. हे व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहेत की वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या रासलीला आहेत, याबाबत नेमकी स्पष्टता नाही. मात्र, या राजकीय नेत्याच्या गौप्यस्फोटानंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिकच्या एका पंचतारांकित सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे व्हिडिओ असल्याने कोणीही अधिकारी आपल्या हनीट्रॅपबाबत समोर येत नसल्याने हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे. प्राथमिक माहितीनुसार, नाशिकसह मुंबई, पुणे येथील बड्या अधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा या हनीट्रॅप प्रकरणात सहभाग असल्याची माहिती आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याच काळात ही खळबळजनक माहिती समोर आल्याने आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आगामी काळात याबाबत नवी माहिती समोर येणार का,असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.