NEWS PRAHAR ( पुणे ) – तरुणांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे घडला. याबाबत पोलिसांनी चौघांविरोधात ‘पॉस्को’सह आत्महत्येस प्रवृत्त करणे, ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे.
विशाल दत्तात्रेय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे व सुनील हनुमंत खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. ८ एप्रिल रोजी पीडित मुलीने राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
तिने सप्टेंबर २०२४ मध्ये आई-वडिलांना गावातील विशाल गावडे हा मी शाळेत ये-जा करत असताना त्याच्या मित्रांसह मोटारसायकलवरून पाठलाग करतो. त्याचे मित्र प्रवीण, शुभम व सुनील यांना तो ‘ही माझी बायको आहे,’ असे म्हणून मला चिडवतो, तर त्याचे हे मित्र मला ‘वहिणी’ म्हणून चिडवत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे तिच्या आई-वडीलांना विशाल यास मुलीला त्रास देऊ नको, असे बजावले होते. त्यानंतरही तो तिला मोबाईलवर मेसेज करत होता.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी तिने इन्स्टाग्रामवरून विशाल याला मला कसलेही मेसेज करत जाऊ नको, असा मेसेज पाठवला. त्यावर त्याने शिवीगाळ केली होती. त्यातून ही मुलगी दडपणाखाली आली होती.
२७ मार्चपासून ती सोमेश्वरनगरला कोर्ससाठी जात होती. २ एप्रिल रोजी तिने घरच्यांना सांगितले की, मी सोमेश्वरला जात असताना विशाल हा पाठीमागून आला व ‘मी गावात एक वर्षापूर्वी कोयत्याने वार केले आहेत, तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन,’ अशी धमकी दिली.
तो गावामध्ये मोटारसायकलवर असताना त्याच्या मित्रासह फेऱ्या मारत होता. त्यामुळे ही मुलगी अधिकच घाबरली होती. ७ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास तिला विशाल याने, ‘लग्न कर, अन्यथा तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, गावच्या यात्रेपूर्वी तुला लग्न करावे लागेल,’ अशी धमकी दिली होती. त्रास असह्य झाल्याने गळफास घेत तिने आत्महत्या केली.