Newsprahar

प्रशासनाच्या आशिर्वादाने वाळू माफियांचा हैदोस… उरूळी कांचन येथील वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करणार का?

NEWS PRAHAR PUNE ) दि : २१ ऑक्टोबर : प्रशासनाच्या आशिर्वादाने उरूळी कांचन परिसरात अजूनही अनेक गावांमध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि वाहतूक धोकादायक बनली आहे.

ग्रामीण भागातील उरूळी कांचन गावा गावातील प्रमुख मार्गांवरून अवैध वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून येतात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरली जात असल्याने रस्त्यांची ताकद कमी होऊन ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत.

या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. अधिकाऱ्यांशी असलेल्या संगनमताने सुरू असलेला वाळू उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कारवाई करण्याचे आश्वासन देत असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू असताना, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. रात्रभर अवैध वाळू वाहतूक सुरू असतानाही महसूल कर्मचारी आणि अधिकारी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास अपयशी ठरले आहेत. वाळू माफियांनी प्रशासनालाच गाफील ठेवत हा काळाबाजार उघडपणे सुरू ठेवला आहे.

महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याची माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.