पोलिस–अन्नपुरवठा आशीर्वादाने हायवे लगत गॅस माफियांचा धंदा फोफावला स्फोटाचा धोका टांगणीला, नागरिकांचा जीव धोक्यात…
NEWS PRAHAR ( PUNE ) : दौंड परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेला गॅस चोरीचा धंदा नागरिकांच्या जीवाशी सरळ खेळ करतो आहे. पुणे–सोलापूर एक्सप्रेस हायवेवर पोलिस स्टेशनच्या शेजारीच अवैधरित्या ट्रक टॅबलेटमधून गॅस बाटल्यांत भरला जात असून, क्षणात भीषण स्फोट होऊन चार–पाच किलोमीटर परिसर जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीही पोलिस व अन्नपुरवठा विभाग हातावर हात धरून बसल्याने त्यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
हायवेलगत असलेल्या दयानंद हॉटेल (ढाबा) आणि मंगलमूर्ती मिसळ यांच्या मध्यभागी बंद पडलेल्या हॉटेलच्या परिसरात गॅस माफियांचा हा बेकायदेशीर धंदा धडाक्यात सुरू आहे. ट्रक टॅबलेटमधून थेट गॅस काढून छोट्या–मोठ्या सिलिंडरमध्ये भरण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते आहे. हा प्रकार दिवस–रात्र सुरू असून, प्रवासी, स्थानिक नागरिक आणि हायवेवरून जाणाऱ्या वाहनचालकांचा जीव धोक्यात घालण्यात येतो आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकार पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू असूनदेखील पोलिस प्रशासनाला याची माहिती नसल्याचे सांगितले जाते. साधी चौकशी केली असता स्थानिक नागरिक गॅस चोरी करणाऱ्या इसमांची नावे सहज सांगत आहेत. गजानन शिंदे , कंवरलाल अशा राजस्थानी गँगकडून हा धंदा सुरू असल्याचे समोर आले असून, स्थानिक गुंडांना हाताशी धरून हे रॅकेट चालवले जात असल्याची चर्चा आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर गॅस काढताना अगदी किरकोळ ठिणगी पडली तरी काही सेकंदांत भीषण स्फोट होऊ शकतो. अशा दुर्घटनेत हायवेवरील शेकडो गाड्यांना आग लागून हजारो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे या अवैध गॅस चोरीचा प्रकार किती धोकादायक आहे याचा अंदाज यावरून सहज येतो.
अन्न व नागरी पुरवठा विभागावरही नागरिकांनी ताशेरे ओढले आहेत. कारण, गॅस वितरणाशी संबंधित अवैध प्रकार रोखणे ही त्यांच्या जबाबदारीत येते. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर गॅस चोरी होत असूनही विभागाने डोळेझाक केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गॅस माफियांचा हा धंदा काही प्रभावशाली अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पोलिस व अन्नपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.
आता पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, दौंड पोलिस व अन्नपुरवठा विभाग या गॅस माफियांना जेरबंद करून परिसराला दिलासा देतात का, की पुन्हा एकदा प्रभावशाली व्यक्तींच्या दबावाखाली हात आखडता घेतात.