Newsprahar

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची वडगाव शेरी येथे आढावा बैठक संपन्न

पुणे दि.२७ पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते, गौरी शंकरदास, आशुतोष पाचपुते, समन्वय अधिकारी गोपाल पाटील तसेच राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशासनाने केलेल्या पूर्व तयारीबाबतची माहिती श्री. बारवकर यांनी दिली. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकाचे यावेळी निरसन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फत पुणे लोकसभा मतदार संघातील शिवाजीनगर व पर्वती विधानसभा मतदारसंघात सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मतदान प्रक्रीयेबाबत जनजागृती करण्यात आली.

शिवाजीनगर मतदार संघातील औंध आरोग्य कोटी व पर्वती मतदार संघात श्री संत गाडगेबाबा आरोग्य कोटी धनकवडी येथील सफाई कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व सांगून मतदानाची शपथ देण्यात आली. पर्वती विधानसभा मतदार संघ, निवडणूक शाखा, जिल्हा पुरवठा अधिकारी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती प्रेरणा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे व जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.