Newsprahar

BIG BREAKING : प्रमुख पदांचा पदभार जालिंदर सुपेकर यांच्या कडून घेतला काढून; मोठी कारवाई..

News Prahar ( पुणे ) : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात नाव आल्यामुळे पोलीस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केली आहे. सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. 

आज वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख केला. सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे सांगत मुलाच्या जन्मपत्रिकेत मामा म्हणून त्यांचे नाव आहे. असा खुलासा त्यांनी केला. 

कस्पटेंच्या या पत्रकार परिषदेनंतर गृहविभागाने तातडीने सुपेकर यांच्यावर कारवाई केली आहे. जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर , नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. 

नेमका शासनाचा आदेश काय?

“विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं आहे. 

तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक” या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.