Newsprahar

जेजुरीत मटक्याचा ‘T-20’ सामना; बुकींची धावसंख्या वाढतेय, पोलिसांना विकेट सापडेना!

जेजुरी । प्रतिनिधी :

देवाच्या भंडाऱ्याने पिवळीधमक होणाऱ्या ऐतिहासिक जेजुरी नगरीत सध्या भलताच ‘खेळ‘ रंगला आहे. खंडोबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दररोज हजारो भाविक जेजुरीत येतात; पण याच पावन भूमीत आडोशाला ‘मटक्याचा टी-२०’ (Satta Matka) सामना जोरात सुरू असल्याची चर्चा नागरिक उघडपणे करू लागले आहेत.

क्रिकेटच्या टी-२० सामन्यासारखाच हा मटका बाजारही दर तासाला आपला पॅटर्न बदलत असून, बुकींची कमाईची धावसंख्या दिवसेंदिवस वाढतेय; मात्र या अवैध धंद्यांची ‘विकेट‘ घेण्यात स्थानिक पोलिसांची फिरकी पार निष्प्रभ ठरल्याचे चित्र आहे.

डिजिटल मटक्याची ‘पावरप्ले‘ बॅटिंग

पूर्वी पत्र्याच्या शेडमध्ये किंवा गल्लीबोळात छुप्या पद्धतीने चालणारा मटका आता थेट व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि ऑनलाईन ॲप्सच्या माध्यमातून ‘हायटेक’ झाला आहे. वेगवान कट-आकडे: टी-२० सामन्यांप्रमाणेच सकाळी कल्याण, दुपारी टाईम आणि रात्री मेन बाजार असा दिवसातून अनेकदा खेळ चालवला जातो. रोजच्या कमाईची आशा दाखवून हातावर पोट असणारे कामगार, तरुण वर्ग आणि भुललेल्या नागरिकांना या मटक्याच्या जाळ्यात ओढले जात आहे. 

बुकींची धावसंख्या वाढतेय, पोलीस मात्र ‘डॉट बॉल‘ वर!

मटका बुकी आणि एजंट रोज लाखोंची उलाढाल करत असून, त्यांची आर्थिक ‘धावसंख्या‘ गगनाला भिडली आहे. शहरात कुठे ना कुठे टेबल मांडून किंवा मोबाईलवरून खुलेआम हे व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. दुसरीकडे, अधूनमधून किरकोळ कारवाईचा देखावा करणाऱ्या पोलिसांच्या पदरी मात्र मुख्य बुकींची ‘विकेट‘ पाडण्यात यश आलेले नाही. “कारवाई झाली तरी फक्त गल्ल्यावर बसलेल्या छोट्या टपरीवाल्यांवर, मुख्य सूत्रधार मात्र कायम नॉट आऊट,” असा उद्विग्न सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

भंडाऱ्याच्या नगरीला मटक्याचा डाग ?

जेजुरी हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अशा पवित्र तीर्थक्षेत्रात अवैध धंद्यांचे जाळे पसरल्याने स्थानिक नागरिक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जेजुरीसारख्या पवित्र भूमीत मटक्याचे जाळे पसरणे हे दुर्दैवी आहे. तरुण पिढी यामध्ये उद्ध्वस्त होत आहे. पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करून मुख्य बुकींच्या मुसक्या आवळाव्यात आणि जेजुरीला या अवैध धंद्यांतून मुक्त करावे.”

आता स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी या मटका चालकांच्या दांड्या उडवून त्यांची ‘विकेट‘ घेणार, की बुकींची ही टी-२० मालिका अशीच अविरत चालू राहणार? याकडे संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.