Newsprahar

कुंभारवाडा मालमत्ता प्रकरणात तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह; पुनर्तपासणीची मागणी….

मुंबई : कुंभारवाडा, मुंबई क्र. ४ येथील मालमत्तेच्या कथित बनावट दस्तऐवज प्रकरणातील तपास प्रक्रियेवर मूळ तक्रारदार श्री. रफीक इब्राहिम तांबे यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात निष्पक्ष व स्वतंत्र पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तांबे यांच्या तक्रारीनुसार, सदर मालमत्ता कथितरीत्या बनावट व खोट्या दस्तऐवजांच्या आधारे खरेदी केल्याचा आरोप श्री. मुहम्मद इक्बाल सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच मालमत्तेचा ताबा मिळविण्यासाठी आपल्यावर धमकी व दबाव आणल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे.

या प्रकरणी तांबे यांच्या तक्रारीवरून दादर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास Anti-Extortion Cell कडे वर्ग करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, आरोपपत्र दाखल होण्यामध्ये उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाचीही भूमिका असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

मात्र, आरोपपत्राची प्रत पाहिल्यानंतर तपासाच्या पद्धतीबाबत तक्रारदारांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तसेच संबंधित मालमत्ता विक्री करणाऱ्या व्यक्तींची स्वतंत्र व सविस्तर जबानी व्यवस्थितपणे नोंदविण्यात आलेली नाही. तसेच प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची आवश्यक त्या पद्धतीने चौकशी झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या तपासातील कथित त्रुटींविषयी तांबे यांनी Joint Commissioner of Police, Commissioner of Police आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने व तक्रारी सादर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप अपेक्षित स्वरूपाची प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत तपास प्रक्रियेतील कथित त्रुटी, आरोपपत्रातील बाबी, उपलब्ध कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबत प्रसारमाध्यमांसमोर माहिती मांडण्यात आली.

तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या

* प्रकरणाच्या तपासाची निष्पक्ष व स्वतंत्र पुनर्तपासणी करण्यात यावी.
* आवश्यक व्यक्तींच्या स्वतंत्र व सविस्तर जबानी नोंदविण्यात याव्यात.
* कथित बनावट दस्तऐवजांची निर्मिती व वापराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी.
* उपलब्ध सर्व कागदपत्रांची आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेची कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी करावी.
* वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या निवेदनांची दखल घेऊन निष्पक्ष तपास सुनिश्चित करावा.

श्री. रफीक इब्राहिम तांबे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीला पूर्वग्रहदूषित पद्धतीने दोषी ठरविणे हा त्यांचा उद्देश नसून, या प्रकरणात कायद्यानुसार निष्पक्ष, पारदर्शक आणि सर्वंकष तपास व्हावा, हीच त्यांची मागणी आहे.