Newsprahar

मोहळ पोलिस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर गॅस चोरीचे रॅकेट..! धंदाचालक मस्त, प्रशासन सुस्त ; पोलिस अधीक्षकांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

NEWS PRAHAR ( सोलापूर ) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळीदेवळी ग्रामपंचायत हद्दीत दोन्ही गावच्या रस्त्यांवर मोबाईल टॉवर जवळ वीर तेजाजी राजस्थानी धाब्याच्या शेजारील बाजूस अनेक वर्षापासून गॅस माफिया सक्रिय असून गॅसची चोरी करून काळ्या बाजारात खुलेआम विक्री करीत आहेत. मोहळ पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर खंडाळी व देवळी यांच्या शिवेवर एका धाब्याच्या बाजूला पत्र्याच्या शेड मध्ये राहुल जाधव उर्फ डीजे रा. टेंभुर्णी व ॲड दहीफळे रा. परळी या दोन गॅस माफियांनी आपले बस्तान मांडले आहे. तर या गॅस माफियांना मोहळ पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारीच गोपनीयरीत्या पाठबळ देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे गॅस माफिया व अवैध धंदेचालकाला धंदा चालविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळच गॅस माफियांनी गाव गुंडाच्या मदतीने व पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे गॅस चोरीचा धंदा खुलेआम थाटला आहे. सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. परंतु, भविष्यात गॅस गळती होऊन एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. गॅसच्या काळाबाजारामुळे परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित गॅस माफिया व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर लवकर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 

कारवाई कधी होणार?

जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांनी डोकेवर काढले. आतातर तक्रारकरून देखील गॅस चोरीच्या रॅकेट वर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. स्वच्छ प्रतिमा व कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.