Newsprahar

कोंढवा मध्ये अवैध धंद्यांची उघडचाळणी!‘खाकी’चा खेळ की नागरिकांचा विश्वासघात?

मटका,गांजा व मसाज पार्लरला पोलिसांचा आश्रय…?

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर अवैध धंदेमुक्त कोंढव्याची जबाबदारी…

NEWS PRAHAR ( PUNE ) : कोंढवा शहर हे शिक्षण आणि मेडिकल हब म्हणून झेपावणाऱ्या मार्गावर असताना अवैध मटका व मसाज पार्लर आमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहे. या धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांकडूनच त्यांना अभय मिळत असल्याच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. नागरिकांच्या मते ‘खाकी’ पोशाखातील काही जण स्वत:चे उखळ पांढरे करण्यासाठी वरवर कारवाया करतात, पण आडून या अवैध व्यवसायांना चालना देतात. त्यामुळे शहरात दुहेरी खेळ सुरू असून, सामान्य माणूस न्यायासाठी कुठे जाईल हा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून या धंद्यांना कायमचा पायबंद लागेल, अशी अपेक्षा आहे.

कोंढवा शहरात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून, नागरिकांच्या जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. पोलिस आयुक्तांनी ठोस कारवाई करून उघडपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांना आळा घातला होता. मात्र, त्यानंतर हे धंदे छुप्या पद्धतीने पुन्हा सुरू झाले असून, शहर पुन्हा गुन्हेगारी व समाजविघातक प्रवृत्तींच्या विळख्यात सापडत आहे.

शहरात मटका , मसाज पार्लर व गांजा विक्री ने फोफावला आहे. या धंद्यांमधून दररोज लाखोंची उलाढाल होत असून, त्याला पोलिसांचे अप्रत्यक्ष सहकार्य असल्याचे बोलले जाते. एकीकडे वरवर मटक्याविरोधात कारवाया दाखवून स्वत:चे उखळ पांढरे केले जाते, तर दुसरीकडे त्याच धंद्यांना ‘आतून’ प्रोत्साहन दिले जाते, असा डबलगेम नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

नागरिक संतप्त :

“कायद्याचे रक्षकच जर अवैध धंद्यांचे रक्षणकर्ते बनले तर सामान्य माणूस न्याय कुणाकडे मागणार?” असा संतप्त सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. अवैध धंद्यांमुळे शहराच्या शैक्षणिक व सामाजिक प्रतिमेवर डाग लागत असून, तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिस आयुक्तांवर अपेक्षा :

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी शहर धंदेमुक्त करून कायदा व सुव्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
दरम्यान आता प्रश्न असा आहे की, सासवडमधील अवैध धंद्यांचा अड्डा खरोखरच उखडून टाकला जाईल का? की पुन्हा एकदा डबलगेमच सुरू राहणार…