Newsprahar

पैसे उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन…

NEWS PRAHAR ( पुणे ) – मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारणाऱ्या तरुणास धमकावून त्याच्याकडून २० हजार रुपये उकळणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे प्रभारी पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. ही घटना मंगळवारी (ता.१७) रात्री विधी महाविद्यालय परिसरात घडली होती.

गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबन केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास तरुण त्याच्या मैत्रिणीसमवेत कारमध्ये गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी पोलीस कर्मचारी गणेश देसाई व योगेश सुतार हे रात्रगस्तीवर होते. ते दोघेही तेथे आले. त्यांनी तक्रारदारास तुमच्याबद्दल तक्रार आली आहे, पोलिस ठाण्यात प्रकरण न्यायचे नसेल तर २० हजार रुपये दे, अशी मागणी केली. तरुणास दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्क परिसरातील एटीएममध्ये नेले.

तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये काढून घेतले. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुण व त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर संबंधित पोलिसांची चौकशी करण्यात आली. डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दोघांबाबतचा कसुरी अहवाल पोलिस उपायुक्त पिंगळे यांच्याकडे पाठविला.

घडलेल्या प्रकाराबाबत दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती देणे आवश्‍यक होते, तरीही त्यांनी तसे केले नाही. त्यांच्या वर्तनामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून दोघांचे निलंबन केल्याचा आदेश पोलिस उपायुक्त पिंगळे यांनी दिले.