NEWS PRAHAR ( PUNE ) :पुण्यासह देशात गाजलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन सरकारी नोकरी मिळवल्याचे समोर आले होते. याप्रकरणी खेडकर यांची नियु्क्ती रद्द करण्यात आली आहे. या प्रकारानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणारे पुणे महापालिकेतील सात अभियंते रडारवर आले आहेत.
महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी सात जणांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याची तक्रार महापालिकेस प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने ही तक्रार गांभीर्याने घेत या प्रकरणांची चौकशी सुरू केली असून, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना सोमवारी (दि. ९) दिल्या.
पूजा खेडकर प्रकरण घडल्यानंतर राज्यातील दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार काही सामाजिक संघटनांनी सर्वेक्षण करून तशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाला सादर केली आहे. त्यानुसार आता अनेक प्रकरणे समोर येवू लागली आहेत.
महापालिकेत गेल्या वर्षी तसेच गेल्या त्यापूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागांत भरती करण्यात आलेल्या अभियंत्यांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्यात आल्याची तक्रार दिव्यांग कल्याण विभागाकडे आली आहे. त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांना पत्र लिहून या सात अभियंत्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले आहे, अशी माहिती प्रशासनाने ‘सीविक मिरर’ला दिली.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवण्याची घटना गंभीर आहे. या बाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत याप्रकरणी सखोल चौकशी करण्यास महापालिका प्रशासनाने केली आहे. या चौकशीत तथ्य आढळून आल्यास या सात जणांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
महापालिकेच्या सेवक वर्ग विभागाने या तक्रारींची दखल घेत संबंधित अभियंत्यांच्या चौकशीबाबत आयुक्तांच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. तर राज्य शासनाकडेही याबाबत तक्रारी आलेल्या असून, शासनाने त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्तांकडूनही याप्रकरणी तत्काळ प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागास देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांची मान्यता मिळताच या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिकेतील सात अभियंत्यांनी सेवेत भरती होताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्या सात अभियंत्यांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यात अस्थिव्यंग प्रमाणपत्राच्या ३ अल्पदुष्टी प्रमाणपत्राच्या ३ आणि कर्णबधिर प्रमाणपत्राबाबत १ तक्रार दाखल झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सेवेतून बडतर्फ केले जाण्याची शक्यता :
एका उमेदवाराने २००१ मध्ये अस्थिव्यंग असल्याचं प्रमाणात सादर करत उपअभियंत्याची नोकरी मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे. २००७ मध्ये अस्थिव्यंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करुन एका उमेदवाराने शाखा अभियंता म्हणून नोकरी मिळवली. २०१६-२०१७ मध्ये एका उमेदवाराने अल्पदृष्टी असल्याचं कारण देत शाखा अभियंता पदावर नोकरी मिळवली, दुसऱ्याने अल्पदृष्टी असल्याचे कारण देत शाखा अभियंता पदावर नोकरी मिळवली, एका शाखा अभियंत्याने कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची माहिती आहे. २०२२ कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालेल्या उमेदवाराने अल्प दृष्टी असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती आहे. अशी तक्रार महापालिकेला आल्याने आता याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार असून त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.