NEWS PRAHAR ( PUNE ) : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस वायव्येकडे सरकत आहे. जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे शहरात, हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस होऊ शकतो. पुण्याच्या घाट भागात आणि पश्चिम भागात ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाट परिसरात पुढील 4 दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे दृश्यमानता देखील खराब राहू शकते.
राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने पूरसदृश्य स्थिती तयार झाली आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे. पुढच्या दोन दिवसात पाऊस ओसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. येथे ऑरेंज अलर्ट असेल. धुळे आणि नंदूरबारमध्ये रेड अलर्ट आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.