Newsprahar

पुण्यातील कोरेगाव पार्क खुलेआम गुटखा विक्री सुरू! अवैध व्यवसायांना मिळतेय अभय…

NEWS PRAHAR  ( पुणे ) – महाराष्ट्रात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने दहा वर्षांपूर्वी लागू केला आहे. कोरेगाव पार्क परीसरातील लेन नंबर १ ते ७ या सर्वत्र ठीकाणी गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. बंदी लागू झाली तेव्हा छुप्या मार्गाने होणारी गुटखा विक्री आता तर खुलेआम होत आहे. शिवाय रात्री बाराच्या सुमारास सुद्धा कोरेगाव पार्क चौकांमधील हॅाटेल बाहेरील पान टपऱ्यांचा धंदा तेजीत आला असून, यांना कोरेगाव पार्क पोलीसांच्या खाकीचा धाक राहिला नसल्याची वास्तव चित्र येथे खुलआम पाहण्यास मिळत आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील बहुतांश पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये गुटख्याची विक्री होत आहे. परराज्यातील नागरिकांची या व्यवसायातील संख्या लक्षणीय आहे. हॅाटेल व पब व्यवसाय आसल्यामुळे नागरिकांची कायम गर्दी असल्यामुळे येथे गुटखा विक्रीची उलाढाल जास्त प्रमाणात होते. आधी गुटखा विक्री करणारे किरकोळ व्यावसायिक या धंद्यात तरबेज झाल्याने गब्बर झाले आहेत.

गुटख्याच्या धंद्यातून होणाऱ्या अर्थकारणाची गणिते जुळविण्यात पटाईत झाल्याने “तेरी भी चूप, मेरी भी चूप म्हणत‘ गुटखा विक्रीची दिवसाची उलाढाल बघून धडकी भरत आहे. राज्यात गुटखा तसेच पानमसाल्याचे उत्पादन, वितरण, साठा व विक्रीस अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नुसार बंदी आहे.

गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही कोरेगाव पार्क या ठीकाणी सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. कोरेगाव पार्क परिसर तर गुटखा विक्रीचा घाऊक बाजार झाला आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क येथील अवैध गुटखाविक्रीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कुंपणच खातेय शेत शहरात गुटखा विक्रेत्यांची मोठी साखळी आहे.

या गुटखा विक्रीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र, कुंपणच शेत खात असल्याने कारवाई करायची कोणी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठोस कारवाईची गरज..?

कोरेगाव पार्क परिसरात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे.परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात कोरेगाव पार्कमध्ये कुठेही गुटख्याचा साठा सापडला नाही. की विक्री होताना दिसत नाही. तरी सुद्धा बाजारात मोठ्या प्रमाणावर गुटखा उपलब्ध होऊन त्याची बिनधास्त विक्री कशी होत आहे हा संशोधनाचा भाग आहे.

गुटख्याची चोरटी विक्री करणारे विक्रेते व त्यांना माल उपलब्ध करून देणारे व्यापारी मोकाट सुटले आहेत. दुकानातून अथवा पानपट्टीतून खुलेआम गुटखा विक्री होत असली तरी कधी कधी अनोळखी ग्राहकाला त्रयस्थ ठिकाणी पाठवून किंवा बोलावून चोरून विक्री केली जाते. नाहीतर सरळ गुटखा मिळत नसल्याचे सांगून सावध होतात.

कायद्याला तिलांजली

राज्यात सन 2012 ला गुटखा बंदी लागू झाली. हा कायदा आमलात येऊन दशकपूर्ती झाली. मात्र, गुटखा बंदी फक्त कागदोपत्रीच अडकून राहिली. गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कायदे लागू झाले. याशिवाय नागरिकांना गुटख्यापासून परावृत्त करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येते. परंतु प्रशासनाकडून कायद्याला तिलांजली दिली जात आहे.