Newsprahar

श्रीरामपूरमध्ये पोलिसांवर कोयत्याने हल्ला; ​पोलिस कर्मचारी जखमी…

NEWS PRAHAR ( श्रीरामपूर )  दि : ०८ जानेवारी  ​: तळेगाव दाभाडे (पिंपरी चिंचवड आयुक्तालय, जि. पुणे) पोलिस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी आले असता, त्यांच्यावर ३० ते ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केली. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास इराणी गल्ली (वॉर्ड नं. १) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षकाने स्वसंरक्षणार्थ शासकीय पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. या धाडसी कारवाईनंतर मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले.

​तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली, वार्ड नं.१, श्रीरामपूर) हा श्रीरामपूरच्या इराणी गल्लीत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, फिर्यादी पोलिस हवालदार अजय सरजिने आणि सहकाऱ्यांनी स्थानिक श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने दुपारी २:४५ च्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा टाकला.

पोलिस आल्याचे समजताच आरोपी आयद सय्यद याने मागच्या दारातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस हवालदार किरण मदने यांनी पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी आरोपीने आरडाओरडा करत गल्लीतील ३० ते ४० लोकांचा जमाव जमवला. ‘पत्थर फेको, कुछ नही होगा’ असे म्हणत त्याने जमावाला पोलिसांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली. ५ ते ७ अनोळखी व्यक्तींनी पोलिसांशी झटापट करून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला.

​आरोपीच्या चिथावणीनंतर ‘झेरू’ नावाच्या एका तरुणाने हातात कोयता घेऊन पोलिसांवर हल्ला चढवला. त्याने पोलिस हवालदार मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मदने यांनी तो वार हाताने अडवल्यामुळे त्यांच्या मनगटावर गंभीर जखम झाली. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या मदने यांना बाजूला सारून जमाव पोलिसांच्या अंगावर धावून आला.

जमाव हिंसक झाल्याने आणि पोलिसांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने, उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी तत्काळ निर्णय घेत आपल्या शासकीय पिस्तुलातून हवेत एक राउंड फायर केला. गोळीबाराच्या आवाजाने जमावाची पांगापांग झाली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस कुमक मागवून आरोपी आयद सय्यद याला पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. ​

याप्रकरणी हवालदार अजय सरजिने यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आयद बाबूलाल सय्यद, झेरू (पूर्ण नाव माहीत नाही), महिलांसह इतर ५ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी पोलिस कर्मचारी मदने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.