NEWS PRAHAR ( बारामती ) : शहरातील एकनाथ गणेश महोत्सवाच्या बॅनरवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड लावण्याचा प्रयत्न शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी मंगळवारी (ता. 10) केला.
अजित पवार व त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणीतरी महोत्सवाच्या निमित्ताने शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावलेले होते, त्याला भेट देण्यासाठी यावे असा आग्रह सुरेंद्र जेवरे यांनी केला होता. अजित पवार या कार्यक्रमासाठी आले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या जेवरे यांनी भिगवण चौकात उभारलेल्या बॅनरवरील अजित पवार यांच्या फोटोवर काळे कापड टाकून तो दिसू नये, असा प्रयत्न केला.
पोलिसांनी तेथे धाव घेत सुरेंद्र जेवरे यांना चौकातून पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण पोलिस ठाण्यात येतो असे जेवरे यांनी सांगितल्यानंतर ते स्वत:च पोलिस ठाण्यात गेले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेनंतर तातडीने संबंधित बॅनर हटविले गेले.