Newsprahar

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे वाजलेत बारा ..! सर्वसामान्य शिरूरकर म्हणतो आता आलेला साहेब आहे का बरा…!

NEWS PRAHAR  ( शिरूर ) : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खाकी वर्दीतील धाकच राहिलेला नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिरूर पोलीस स्टेशन हे सर्वात मोठी हद्द असलेले पोलीस स्टेशन आहे जवळपास या पोलीस स्टेशनची हद्द शंभर किलोमीटर पर्यंत आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दी शेजारी नगर जिल्हा सुरू होतो. शिरूर शहर एक मोठी बाजारपेठ म्हणुन ओळखली जाते त्यामुळे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यातील नागरिकांचा शिरूरला मोठ्या प्रमाणात वावर असतो. याच गोष्टीचा फायदा काही गुन्हेगारी वृत्तीचे लोक घेत असतात.
शिरूर हद्दीत गुन्हा करून नगर हद्दीत जाणे त्यांना अत्यंत सोयीचे आहे. मध्यंतरी तत्कालीन पोलीस निरीक्षण जोतीराम गुंजवटे यांनी शिरूर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारला होता. परंतु त्यांना शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यात यश आले नाही. अशी नागरिकांमध्ये कुजबूज होती. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे.
दुचाकी व चार चाकी वाहन यांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरीच्या काळात चक्क एका पोलिसाची चार चाकी गाडीच चोरीला गेली ! मग सर्वसामान्य जनतेचे काय ?शिरूर शहरात रोडरोमिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या रोडरोमियो यांचा वावर शाळा महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात होतो. शहरात मारामाऱ्या होणे, कोयता घेऊन मागे पळणे, गोळीबार हे नित्याचाच प्रकार झाला आहे.
तसेच घरफोडी व भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. मधल्या काळात टाकळी हाजी भागामध्ये शेतकऱ्यांचे वीज पंप चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या. तसेच शिरूर शहरामध्ये वाहतूक कोंडी ही नित्यचीच डोकेदुखी झालेली आहे. यावर पोलीस निरीक्षक साहेब रामबाण औषध शोधणार का ? या सारख्या अनेक समस्यांचा सामना शिरूरकरांना करावा लागत आहे.
अनेक छोटे मोठे गुन्हे घडून सुद्धा त्यांचा तपास अद्याप सुद्धा शिरूर पोलिसांना लावता आला नाही. एका घटनेमध्ये एका महिलेने शिरूर पोलीस गुन्हा दाखल करत नाही यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तर काहींना गुन्हा नोंद करून घेत नाही म्हणून पोलिस अधिक्षक यांच्याकडे जावे लागले.
आता नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदेश केंजले हे खरंच नावाप्रमाणे शिरूर करांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ॲक्शन व कडक संदेश देणार का ? यासाठी शिरूरकर या गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. का पुन्हा पहिले पाढे ५५. ? अशी चर्चा लोकांमध्ये दबक्या आवाजात चालू आहे. कारण तत्कालीन पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे हे कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरले होते. त्यामुळेच सामान्य शिरूरकर म्हणतो शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे वाजलेत बारा! आता नवीन आलेला साहेब आहे का बरा!