Newsprahar

शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत…

NEWS PRAHAR ( बारामती ) : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे. खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार  यांच्या प्रचारसभे मध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली व अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाला. 

तेव्हाही शरद पवारांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होऊ लागली आहे.

शरद पवार म्हणाले, मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या.

आतापर्यंत १४ निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबलं पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे”, असे भाष्य शरद पवार यांनी केले आहे.