Newsprahar

राज्य सरकारचा मोठा निर्णय : कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यां शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही…

NEWS PRAHAR : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरुन नवा वाद सुरु आहे. या निर्णयाबाबत महायुतीत एकमत नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. 

अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथील विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. दरम्यान,  राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना, राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर बोलताना सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाईल, अशी माहिती दिली. मात्र, ले-आऊटवाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीज घेऊन फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिला होता की, शेतकऱ्यांना पुढील ५ वर्षे शेतात वीजेचा बिल येणार नाही. तसेच, आमच्या सरकारने सांगितले की, खऱ्या खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत, पण शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, ज्यांचे लेआऊट आहेत, फॉर्म हाऊससाठी कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी भेटणार नाही. धन दांडग्याना कर्जमाफी नको, ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला हवी.

 शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यासोबत कालच चर्चा झाली आहे, आमची समिती तयार होत आहे, अधिवेशन काळात ती घोषित करू.  येत्या ३ तारखेला ४ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनात बैठक लावली आहे. माझ्या दालनात बैठका लावल्या आहेत. या बैठकीत ८ ते १० मंत्री सोबत असतील, तेव्हा महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील, अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली आहे.