गुटखा विक्री करण्यासाठी खालून वर पर्यंत प्रत्येक डीलर १५ लाख रुपये मासिक वाटत असल्याची नागरिकांमध्ये कुजबुज…
NEWS PRAHAR ( पुणे ) – पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध धंद्यांना ‘फुल स्टॉप’ लावल्यानंतरही पुण्यात व पिंपरी चिंचवडमध्ये गुटखा खुलेआम विक्री होत असल्याने गुटख्याला कोणाचे अभय लाभले आहे का ? याबाबत पुण्यासह राज्य पोलीस प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रात बंदी असूनही पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र गुटखा, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहेत. पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील गुटखा बंदी कागदावरच असल्यामुळे बेकायदा गुटखाविक्री जोमात सुरू आहे.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड अंतर्गत अवैध धंद्यांचे समूळ नष्ट करण्यासाठी दोनीही पोलीस आयुक्तांनी कडक उपाय योजना राबविल्या. यात महत्वाचे म्हणजे हद्दीतील वसुली बहाद्दरांची यादी तयार करून त्यांना अल्टिमेटम देण्यात आला. यातील बोर्डावरील 44 जणांना प्रशिक्षण देखील देण्यात आले. असे असताना देखील गुटखा विक्रेते खुलेआम विक्री करत आहेत. यापाठीमागे कोण आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.
शासनाचे पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत का? कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटखाविक्री जोरात सुरू आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विजापूर, निपानी,कर्नाटक मार्गे गुटखा येत असल्याचे बोलले जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवड येथील शेख व भाठी या व्यक्ती नियमीतपणे व राजरोसपणे पिंपरी चिंचवड व पुणे शहरा मध्ये गुटक्याची अवैध्य वाहतूक करीत आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गुटखा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत १५ ते २० रुपये आहे.
गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील खरेदीदारांना त्यांच्या या गोडावून मधुन गुटखा पुरविला जातो. महिन्याचा गुटक्याचा साठा करून ठेवलेला असतो आणि नंतर तो विविध मार्गाने शहरातील अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते. एक पानटपरीधारक महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतो. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत टपरी व बांधकामांवर महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध धंदेही सुरू होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
गुटख्याचा मलिदा कोणाकडे ?
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात खुलेआम सुरु असलेल्या गुटख्याचा मलिदा कोण लाटत आहे ? याबाबत पुणेकरांमध्ये चर्चा रंगली आहे. एकीकडे कारवाईचा फार्स निर्माण करून दुसरीकडे मलिद्याचा वाटा लाटायचा असाच पायंडा दिसून येत आहे. अन्न आणि औषध विभागाकडून देखील गुटख्याच्या कारवाया होत नसल्याने प्रशासनातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पुण्यातील गुटख्याचे व्यापारी :
निजाम, प्रकाश भाटी, सुजित, बालाजी, तानाजी देशमुख, प्रशांत भंडारी, सुमित, शाम राठोड, अंकुर गुप्ता, रांका, उबाळे, संदीप, अरिफ, खान, सागर लुमिया, युसुब अंसारी, गफूर व इतर…
पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई..?
अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. आणि अवैध विनापरवानगी बांधकामांवर महानगरपालिका कारवाईच करीत नाही. यामुळे गुटखा व मावा हा व्यवसाय अनाधिकृत दुकाने टपऱ्या मध्ये पुणे व पिंपरी चिंचवड या ठिकाणी सर्रास सुरु आहे.