Newsprahar

बडतर्फ 5 पोलीस निरीक्षकांची नव्याने नियुक्ती केल्याने खळबळ…

NEWS PRAHAR : ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे अपील केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यासह चौघा जणांना पुन्हा पोलीस दलात नियुक्ती मिळाली आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल मधून ड्रगची तस्करी करणाऱ्या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलीस हवालदार राजेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं.

आता या बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा गृह विभागाने पोलीस दलामध्ये समाविष्ट करून घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रगची तस्करी करत होता. या प्रकरणात ललित पाटील याच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तस्करीत सहभाग आढळल्या प्रकरणात त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. आता यांना पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करून घेतल्याने खळबळ उडाली आहे.