NEWS PRAHAR ( पुणे ) : पुणे शहरातील कल्याणी नगर भागात पोर्शे कारने दोघांना उडवलं होतं. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
तरी देखील बड्या बापांची लेकरं दारु पिऊन गाडी चालवून इतरांच्या जीव धोक्यात घातल असल्याचे पाहायला मिळत आहे. पोर्शे अपघातानंतर पुण्यात अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या मुलाने दारु पिऊन टेम्पोला जोरात धडक दिली. त्यामध्ये चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड उर्फ बंडू तात्या यांचा मुलगा सौरभ गायकवाड याने दारू पिऊन अपघात केला. ड्रंक एन्ड ड्राईव्हच्या या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झालेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाड हा देखील जखमी झालाय.
पुण्यातील मांजरी – मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे मंगळवारी (दि. 16) पहाटे हा अपघात घडलाय. सौरभ गायकवाड हा हॅरीयर कार (MH 12 TH 0505) घेऊन पहाटे साडे पाच वाजता मुंढव्यातील घरी निघाला होता. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने धडक दिली.
अपघातानंतर त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी जखमी चालक राजा शेख याला वरद लाइफ हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी, चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला होता. तर क्लीनर राजा शेख याच्या चेहऱ्यावर खरचटले असून पायला जखम झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सौरभ याने उलट्या दिशेने भरधाव वेगात येऊन टेम्पोला धडक दिली. अपघातानंतर तो घटनास्थळी न थांबता निघून गेला.
याप्रकरणी सौरभ गायकवाडच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(अ), 125(ब), मोटार वाहन कायदा कलम 184, 134(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक बाबुराव हिवराळे (वय-36 रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.