Newsprahar

नागरिकांचा फुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात जोरदार निषेध मोर्चा….

NEWS PRAHAR ( पुणे ) : फुरसुंगी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी शनिवारी तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढला. नगर परिषद स्थापनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना नागरिकांमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून, मूलभूत गरजांपासून दूर ठेवले जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.
 

संकेत विहार व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेला. मार्च महिन्यात याच प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांना नागरिकांशी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल तीन महिने उलटून गेले तरीही कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.

फुरसुंगीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, यासारख्या मूलभूत सुविधा आजही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. “नगर परिषद ही जनतेसाठी काम करणारी संस्था आहे की केवळ नावापुरती यंत्रणा?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नगर परिषदेच्या प्रशासकांना दिले होते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक कार्यालयात येण्याचे टाळल्याचा आरोप करत, निषेध मोर्चा काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, असे संतोष हरपळे यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे फुरसुंगी नगर परिषदेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.