NEWS PRAHAR ( पुणे ) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दांडिया कार्यक्रमात टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली.
अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोरे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोरे त्याच्या मामाच्या मुलासह संतोषनगर परिसरात मंगळवारी (ता. ८) रात्री दांडिया कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमित चोरगे आणि त्याचे साथीदार तेथे आले. चोरगेचे यापूर्वी काहीजणांशी भांडण झाले होते. या वादातून आरोपींनी दांडिया कार्यक्रमात कोयते हवेत फिरवत दहशत माजवली. त्यांनी मोरे याच्या डोक्यात आणि पाठीवर कोयत्याने वार केले. त्यात मोरे गंभीर जखमी झाला. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मुंढव्यात दांडियात आणखी एकावर वार –
दांडिया खेळताना झालेल्या वादातून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात मंगळवारी घडली. आनंद देवेंद्र मांगले (वय ४५, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी मांगले यांची पत्नी शीतल (वय ४३) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ईश्वर दांडेली, मारुती गवंडी, ऋषीकेश दांडेली, निखिल गवंडी, विशाल गवंडी, संतोष दांडेली, जावेद शेख, अनिकेत अनगल (सर्वजण रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.