Newsprahar

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा बोलबाला कायम…

लोणी काळभोर : मागील काही महीन्यान पासुन उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. त्याच कारण म्हणजे उरुळी कांचन पोलिसांचा अद्यापपर्यंत चोरीचा कोणताही तपास न लागल्याने पोलिसांचा दम कमी होताना दिसत आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत चाललेल्या चोरीच्या सत्रांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या झाल्याच्या अनेक घटना आज रोजी घडतच आहेत.यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांना आता खाकीचा दम राहीला
नाही.

दिवसाढवळ्या उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घरफोडी झाली होती. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु असून उरुळी कांचन पोलीस मात्र आमंच्या हद्दीत काहीच होत नसल्याच ढोंग करताना दिसत आहेत.दरम्यान, सोरतापवाडी येथे घरात कोणी नसताना घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.तगडी पोलिस यंत्रणा असतानाही उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

अनेक घरफोड्याच्या घटना अस्पष्टच.उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली, मात्र त्या वाहनांचा व चालकांचा आजूनही थांगपत्ता लागला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप अस्पष्टच आहेत.

खबरी संपले ; स्थानिक गुन्हे शाखा गायब..?

उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते? असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करू लागले आहेत.मागील काही दिवसांपासून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगाव मूळ,शिंदवणे, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे पोलिस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखा कुठे गायब? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.