Newsprahar

अल्पवयीन मुलीच्या बनावाने पोलिस यंत्रणा लागली कामाला…

NEWS PRAHAR ( बारामती ) :का अल्पवयीन मुलीने आपल्यावर चार विद्यार्त्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर सुरु झाले ते एक नाटय.बारामतीत काल (ता. 14) घडलेल्या या नाटयमय घटनेनंतर केवळ पोलिस यंत्रणाच नाही तर थेट उपमुख्य़मंत्री अजित पवार हेही हादरून गेले होते.

एका अल्पवयीन मुलीने ही घटना घडल्याचे रडत एका माध्यम प्रतिनिधीस फोन करुन सांगितली. संबंधित प्रतिनिधीने तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना ही घटना कळवली. पोलिसांच्या पायाखालचीच वाळू सरकली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जात संबंधित मुलीला ताब्यात घेतले व चौकशी सुरु केली.

दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्र्यांपर्यंत ही घटना पोहोचल्यानंतर त्यांनीही तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना सर्वांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या. घटनाच मोठी असल्याने अख्खी पोलिस यंत्रणाच कामाला लागली होती.

पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने या मुलीकडे तपास सुरु केला, तेव्हा तिच्या प्रत्येक वेळेसच्या उत्तरात काहीतरी वेगळेच पुढे येत होते. चाणाक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी मुलगी काहीतरी वेगळच सांगून दिशाभूल करते आहे हे ताडले. महिला पोलिस कर्मचारी व अधिका-यांची मदत घेत मुलीला विश्वासात घेतले गेले.

तिला बोलते केल्यानंतर तिच्या नवीन मित्रासोबत ती बोलत होती हे एका जुन्या मित्राला आवडत नव्हते व त्या मित्राला जेलमध्ये पाठविण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी हा बनाव रचल्याचे अखेर स्पष्ट झाले. असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. एका मालिकेतील घटना बघून हे केल्याचे संबंधित मुलीने सांगितले. अल्पवयीन मुलीकडूनही अशी दिशाभूल व बनावाचा प्रकार पोलिसांनाही चक्रावून सोडणारा ठरला.