NEWS PRAHAR ( पुणे ) दि : ३० ऑक्टोबर : हडपसर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार आल्यानंतरही वेळेत टाळाटाळ करून घटनास्थळी न पोहोचल्यामुळे हडपसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या कारवाईचे आदेश दिले असून, निलंबित कर्मचाऱ्यांची नावे मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी आहेत. हे दोघेही हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील कॉप्स २४ बीट मार्शल, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत होते.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता ‘डायल ११२‘ वरून एस. के. रेसिडेन्सी हॉटेल, १५ नंबर चौक, हडपसर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. मात्र दोन्ही शिपायांनी तत्काळ घटनास्थळी न पोहोचता तपास न केल्याने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
आदेशात नमूद केल्याप्रमाणे, या दोन्ही कर्मचाऱ्यांचे वर्तन ‘बेजबाबदार आणि बेफिकीर‘ असून, त्यांच्या निष्काळजीपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे दोघांनाही पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.