NEWS PRAHAR : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार नवीन बसेस दाखल होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली असून, त्यांनी दोन ई-बस डेपोचे ऑनलाईन उद्घाटनही केले.
दीड हजार बसेसची भर….
पीएमपीएमएल स्वतःच्या निधीतून ५०० बसेस खरेदी करणार आहे. याव्यतिरिक्त, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ५०० सीएनजी बसेस आणि ५०० ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे एकूण १५०० नवीन बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांच्या हस्ते पीएमपीएमएलच्या भेकराईनगर बुद्रुक येथील ई-बस डेपोचे तसेच माण येथील ई-बस डेपोचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अण्णा बनसोडे , आशिष शेलार , पीएमसी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले , पीएमपीएमएल अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह आणि पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते.
वाढत्या शहरासाठी पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर…
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ पर्यंत ४१ लाख होण्याचा अंदाज आहे, असे अजित पवार म्हणाले. या वाढत्या लोकसंख्येसाठी रस्ते, मेट्रो , रेल्वे आणि वाहतूक सेवा सुधारण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचा मेट्रो मार्ग विस्तारणार असल्याचेही ते म्हणाले.
सध्या शहराला पवना आणि आंद्रा धरणातून पाणी मिळते. वाढीव गरज भागवण्यासाठी ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, विकासासाठी मुळशी धरणाचेही पुरेसे पाणी मिळणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.