Newsprahar

खराडीत पहाटे ४ पर्यंत पब सुरू असल्याची चर्चा; पोलीस-उत्पादन शुल्क विभागावर प्रश्नचिन्ह!CP साहेबांच्या आदेशाला खराडी पोलिसांचा ‘ब्रेक’ का?

CP साहेबांच्या आदेशाला खराडी पोलीस घाबरत नाहीत का?

लेट नाईट पबवर कारवाईचा अभाव; उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह — स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल

पहाटे ४ वाजेपर्यंत आस्थापना सुरू असल्याचा दावा; नियमभंग होत असल्यास कारवाई कधी?

खराडी | प्रतिनिधी : यश तांबोळकर 

पुणे शहरातील खराडी परिसरात काही पब व बार निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही आस्थापना पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी, वाहनांची वर्दळ, मोठ्या आवाजातील संगीत आणि परिसरात होणाऱ्या गोंधळामुळे निवासी सोसायट्यांमधील नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप आहे.

लेट नाईट पबला नेमका कोणाचा ‘आशीर्वाद’?

खराडी परिसरातील काही पब व बारमध्ये निर्धारित वेळेच्या मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर संबंधित आस्थापना परवानगीच्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू राहत असतील, तर त्यांच्यावर संबंधित यंत्रणांकडून कारवाई का होत नाही, असा थेट सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

“सामान्य नागरिकांसाठी नियम आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी वेगळे नियम आहेत का?” असा संतप्त सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सोसायट्यांतील नागरिकांना ‘रात्रभर त्रास’ .

पब परिसरातील निवासी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मध्यरात्रीनंतरही वाहनांची ये-जा, हॉर्न, ग्राहकांची गर्दी आणि मोठ्या आवाजातील संगीत सुरू राहत असल्याने शांतता भंग होत आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच पहाटे कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्न ?

लेट नाईट सुरू असलेल्या आस्थापनांबाबत तक्रारी होत असतील, तर स्थानिक पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाकडून प्रत्यक्ष तपासणी आणि नियमांनुसार कारवाई केली जाते का, याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले जात असताना प्रत्यक्षात काही आस्थापना पहाटेपर्यंत सुरू राहत असतील, तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

‘लागेबांधे’च्या चर्चेला अधिकृत दुजोरा नाही 

कारवाई होत नसल्यामागे स्थानिक पातळीवर काही लागेबांधे किंवा आर्थिक हितसंबंध आहेत का, अशी शंका काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या आरोपांना सध्या कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

त्यामुळे संबंधित आस्थापनांची परवानगी, निर्धारित वेळ, प्रत्यक्ष व्यवसायाची वेळ तसेच नियमांचे पालन याची संबंधित विभागांनी तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

न्यूज प्रहार संबंधित पोलीस अधिकारी, पब व्यवस्थापन आणि उत्पादन शुल्क विभागाची अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधत आहे. त्यांचा खुलासा किंवा अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.