NEWS PRAHAR ( लोणावळा ) : लोणावळा परिसरातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हे आदेश दिले आहे.
लोणावळा परिसरातील एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोना किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण या परिसरात प्रामुख्याने पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
सध्या पावसाळा हंगाम सुरु झाला असून, देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा व परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत.
वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी लोणावळा पोलिस ठाणे हद्दीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची पाहणी केली होती. लोणावळा परिसरात रस्ते अपघात तसेच पर्यटक बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
लागू केलेले निर्बंध पुढीलप्रमाणे :
- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे.
- धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे
- पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, डोंगरदऱ्या, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे.
- पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य वाहतूक, विक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे.
- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे,
- वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालविणे.
- बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
- सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॅस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे, स्पीकर वाजवणे
- धबधबे, धरणे परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे.