NEWS PRAHAR ( शिक्रापूर ) : भरधाव कारने समोरील रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. रिक्षातील दोघे जखमी झाले आहेत. कारने विरुद्ध दिशेला जाऊन एका दुचाकीला देखील धडक दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर घडली.
विशाल गोवर्धन चव्हाण (वय २५, रा. चाकण), नागेश गणेश जाधव (रा. निगडी) अशी जखमींची नावे आहेत. विशाल यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोरख साहेबराव देशमुख (रा. देशमुखवाडी, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल हे त्यांची रिक्षा घेऊन नातेवाईक नागेश यांच्यासोबत शिक्रापूर-चाकण रोडने जात होते. त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने (एमएच १४/एलबी ०८३५) रिक्षाला जोरात धडक दिली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेला गेली आणि एका दुचाकीला धडक दिली. विशाल यांची रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. यामध्ये विशाल आणि त्यांचे नातेवाईक नागेश हे गंभीर जखमी झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.