NEWS PRAHAR ( पुणे ) : मुळामुठा नदीमध्ये रसायनमिश्रीत दुषित पाणी आल्याने हाजारो माशांचा मृत्यू झाला असून, नाईक बेट परिसरात खच पडला आहे. महापालिकेने याठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. हे दुषिक पाणी कुठुन आले याचा शोध सुरु आहे.
पुणे शहरातून मुळा आणि मुठा नदी वाहते. संगमवाडी येथे या दोन्ही नद्यां‘चा संगम होतो. शहरातील मैलामिश्रीत पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने नदी प्रदूषीत झालेली आहे. मैलमिश्रीत पाणी नदीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी महापालिकतर्फे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. शहरात दिवसाला किमान ९०० एमएलडी सांडपाणी तयार होत आहे, त्यापैकी प्रतिदिन केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडले जाते.
पण तरीही ४५० एमएलडी घाण पाणी थेट नदीत येत आहे. मुठा नदीमध्ये फक्त सांडपणी येत आहे. तर मुळा नदीमध्ये पिंपरी-चिंचवड भागातील कंपन्यांमधून सोडले जाणारे रसायनमिश्रीत केलेले विषारी पाणी प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये येऊन मिसळत आहे. त्यामुळे या नद्यांमधील पाणी सजिवांसाठी धोकादायक आहे.
मुळामुठा नदीमध्ये संगमवाडीच्या जवळ नाईक बेटाजवळ नदीमध्ये मृत माशांचा खच पडलेला आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीही या भागात सुटली आहे. याठिकाणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील आहे.महापालिका प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर तेथील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहे. त्याचा अहवाल पुढील दोन ते तीन दिवसात प्राप्त झाल्यानंतर माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे स्पष्ट होणार आहे.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘मुळामुठा नदीमध्ये माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.नायडू सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया न केलेले पाणी बाहेर आले आहे का याची तपासणी केली असता तसे काही आढळून आलेले नाही. मलनिःसारण विभागाला सांडपाणी वाहिनी फुटली आहे का हे व्यवस्थित तपासणी करण्यास सांगितले. माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे समोर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.