NEWS PRAHAR ( पुणे ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी हल्लेखोरांना मध्य प्रदेशातून पिस्तुले आणण्यास मदत करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी (ता.२५) अटक केली आहे. त्याला मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी एक ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अभिषेक ऊर्फ आबा नारायण खोंड (रा. लक्ष्मी गार्डन सोसायटी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खोंड याच्या अटकेनंतर या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आकडा आता २१ वर गेला आहे. यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत, बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८, रा. नाना पेठ) याने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
वनराज आंदेकर यांचा खून टोळी वादातून झाला असून त्यासाठी वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणण्यासाठी आरोपी अभिषेक खोंड याने आरोपी आकाश म्हस्के, समीर काळे आणि विवेक कदम यांना मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
खून झाल्यावर अभिषेक खोंड प्रसार झाला होता. या कालावधीत त्याला कोणी आश्रय दिला तसेच आर्थिक मदत केली, त्याने आणखी काही पिस्तुले आणली आहेत का, त्याची कोणाला विक्री केली, या बाबींचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.