Newsprahar

मेट्रोच्या बोगद्याला बेलबाग चौकातील खड्ड्याचा नाही धोका..

NEWS PRAHAR ( पुणे ) : बेलबाग चौकातील सीटी पोस्ट ऑफिस परिसरात तब्बल ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या खड्ड्याखाली शिवाजीनगर  न्यायालय -स्वारगेट महामेट्रोच्या मार्गाचा बोगदा आहे. त्यामुळे मेट्रोने प्रशासनाने या भागाची तपासणी केली. तसेच बोगद्याचीही पाहणी केली आहे. या पाहणीनंतर विहीरीमुळे मेट्रो मार्गाला कोणताही धोका नसल्याची माहिती पुणे महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

रस्त्याखाली असलेल्या जुन्या विहीरीवरील स्लॅब खचल्याने ४० फुट खड्डा पडून महापालिकेचा जेटींग मशीनचा एक ट्रक खड्ड्यात गेला होता. गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडल्यानंतर थेट रस्त्यात ४० फुट खड्डा पडून ट्रक पडल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली होती. त्यासोबतच राजकीय वातावरण तापले होते. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. या खड्ड्याच्या खाली मेट्रोचा बोगदा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर महामेट्रोने तात्काळ या भागाची पाहणी केली. या पाहणीत मेट्रोच्या बोगद्याला धोका नसल्याचे समोर आले आहे. बोगदा हा या खड्ड्याच्या १५ मीटर खाली असल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट स्थानकाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महामेट्रोने या मार्गाची कसून तपासणी केली. त्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.

 रस्त्यावर खड्डा पडून ट्रक खड्ड्यात गेल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमावर  प्रसारित झाला आहे. ही घटना घडल्याचे समजताच  घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. या ट्रकसह दोन दुचाकी असल्याचीही माहिती समोर आली होती.  समाधान हॉटेलजवळ सिटी पोस्ट ऑफिसच्या सांडपाणी वाहिन्यांबाबत तक्रारी आल्यानंतर दुरुस्तीसाठी गेलेला पुणे महापालिकेचा ट्रक ४०  फूट खड्ड्यात गेला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. 

लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात चार वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या घनकचरा विभागाचा ट्रक ड्रेनेज लाईन सफाई करण्यासाठी गेला होता. त्यावेळी चालकाने ड्रेनेज लाईनपासून काही अंतर ट्रक पुढे घेऊन पुन्हा मागे घेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जागेवरच भले मोठे भगदाड पडले. त्यामुळे जवळपास ४० फुट खोल खड्ड्यात ट्रक पडला आणि बाजूच्या दोन दुचाकीदेखील खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या. ट्रक खाली जात असल्याचे लक्षात येताच, चालकाने बाहेर उडी मारून जीव वाचविला. क्रेनच्या मदतीने ट्रक आणि दुचाकी बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. जमीन खचल्यानंतर खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ट्रक बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेनची मदत घेण्यात आली होती.