NEWS PRAHAR (लोणावळा) : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लोणावळा नगरपरिषद कर्मचारी विजय साळवे (वय ५३, रा. डी-वॉर्ड गावठाण, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत फिर्याद दिली. भुशी स.क्र.२४ सि.स.१ येथे इंद्रायणी नदीपात्रातील भराव काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते.
लोणावळा नगर परिषदेच्यावतीने हा भराव काढण्यात आला होता. मात्र, पोरवाल यांनी हरित लवादाने दिलेल्या आदेशाचा भंग करून पुन्हा अनधिकृत भराव टाकत राष्ट्रीय हरित लवाद पुणे यांच्या आदेशाचा भंग केला. मंगळवारी (ता. ११) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लवादाच्या आदेशाप्रमाणे अनधिकृत भराव काढून घेण्याचे काम करीत असताना पोरवाल यांनी त्यांची मोटार आडवी टाकत नगर परिषदेचे कर्मचारी विजय साळवे यांना शिवीगाळ करत तुमची नोकरी घालवितो, अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.