NEWS PRAHAR ( पुणे ) : पुण्यात पोर्शे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात आज ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक झाली.या दोन डॉक्टरांनी वेदांत अग्रवालचे रक्ताचे सँपल कचऱ्यात फेकून कुणा दुसऱ्याचेच सँपल टेस्ट करून लॅब रिपोर्ट बनवला.आता विचार करा हे डॉक्टर पोस्ट मार्टेम रिपोर्ट बनवत असतील तेव्हा कोट्यवधींचे व्यवहार करत आलेले असतील. राजकिय गुन्हे, बिल्डर लॉबीची प्रकरणे, खून प्रकरणे, खोट्या आत्महत्या दाखवणे अशी कितीतरी प्रकरणे या डॉ. तावरेने सेटल केलेले असतील.
त्याची फॉरेन्सिक विभागाचा अधीक्षक म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी आमदार सुनील टिंगरे याने शिफारस पत्र दिले होते तर ती शिफारस हसन मुश्रीफ या मंत्र्याने मान्य करून नियुक्ती केली.तसेच ससूनमधीलच संजीव ठाकूर हे ललित पाटील ड्रग प्रकरणात संशयीत होते.त्याला रुग्णालयातून पळून जाण्यास यांनी मदत केली असा यांच्यावर ठपका होता. वेदांत अग्रवाल प्रकरणात या तावरेला एका आमदाराचा फोन गेला होता आणि त्यानंतर वेदांतचा बाप विशाल अग्रवाल या तावरेशी बोलला.
नंतर ऑन ड्युटी नसलेल्या तावरेने तीन लाख रुपयांच्या बदल्यात पाहिजे तसा रिपोर्ट बनवून दिला. दोन व्यक्तींच्या खूनाबाबत निबंध लिहिण्याची शिक्षा दिल्याने जनआक्रोश उसळला खरा पण यात सत्ताधारी भाजपचे लोकप्रतिनिधी कुठेच दिसत नाहीत.मुरलीधर मोहोळ एक कारवाईची निवेदनात्मक चिरुटी देऊन शांत झाले.त्यातही आरोपींवर कारवाई करावी याबाबत चकार शब्द नव्हता. शिवसेना शिंदे गटाचे एक मंत्री तर त्या वेदांतच्या आज्ज्याला भेटून सांत्वन करून आले.राष्ट्रवादी अजित पवार गट तर यात अपराध्यापेक्षा मोठा अपराधी आहे कारण यात वेदांत अग्रवाल आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांच्या गटाचा आमदार सक्रिय आहे.
या सगळ्या जनआक्रोशाची दखल एका व्यक्तीने घेतली तो व्यक्ती म्हणजे रवींद्र धंगेकर! या माणसाने ही अपराधी बनवणारी अन् त्यांना वाचवणारी पूर्ण सिस्टम हादरवून टाकली आहे.अपघात झालेल्या रात्रीपासून ते आजपर्यंत लोकसभा निवडणूक झाली तरी धंगेकर रस्त्यावर आहेत.या प्रकरणात पहिल्यांदा साटेलोटे केलेले पोलीस निरीक्षक आणि सोबतचा पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना स्वतःची कातडी वाचवण्यासाठी कारवाई करावी लागली.
विशेष म्हणजे गृहमंत्री पुण्यात येऊन या पोलिसांवर कसलीही कारवाई झालेली नव्हती.पण धंगेकर जेव्हा पोलीस आयुक्तांवरच कारवाईची मागणी करायला लागले तेव्हा मात्र त्यांना हि कारवाई करावी लागली. या प्रकरणात धंगेकर लोकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरल्याने वेदांत अग्रवालचा जामीन रद्द झाला.त्याच्या फरार बापाला अटक झाली.त्यांच्या ड्रायव्हरवर जबरदस्ती करून गुन्हा स्वतःवर घे म्हणून दबाव आणणाऱ्या त्याच्या आज्ज्याला अटक झाली.त्यांची असलेली जुनी केस वर काढून त्यात अटकसत्र सुरू झाले.
अमीतेश कुमार यांना प्रेसपुढे येऊन तपास आणि कारवाई यांची रोज माहिती द्यावी लागत आहे.सोशल मीडियाची हवा दोन दिवसात विरली असती पण धंगेकर यांनी जो रस्त्यावर संघर्ष केला त्यामुळे सगळ्यांना आपापले काम करावे लागत आहे.आणि दिखावा का होईना पण सत्ताधारी लोकांना यात त्या दोन निष्पाप लोकांची बाजू घेऊन बोलावे लागत आहे. हे सगळं होत असताना आता धंगेकर यांनी मोर्चा भ्रष्ट महानगरपालिका प्रशासनकडे वळवला आणि त्यांनी लगेच अनधिकृत पब आणि बार तोडायला सुरुवात केली.
धंगेकर यांनी एक्साईज खात्याची हफ्ते आणि वसुली कर्मचारी यांची यादीच त्या खात्याच्या अधिकाऱ्यापुढे वाचून त्याच्या चेहऱ्यावर त्याला लाज आणली.त्याच्यासमोर एक लोकप्रतिनिधी काय असतो हे दाखवून दिले आणि जनतेच्या पाठिंब्यापुढं कुणीही मोठा नसतो हे त्याला तोंडावर झापत त्याला घाम फोडला. पुण्यात गेली १३-१४ वर्षे राहतोय पण इतका ॲक्टिव लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बघितला. तेही काँगेस पक्षाचा.यानंतर स्वतः राहुल गांधींनी या प्रकरणावर एक व्हिडिओ बनवून त्यात बरेच प्रश्न सरकारला विचारले.आणि हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर गेले.
धंगेकर यांच्या पूर्व जीवनात त्यांनी काही चुका केल्या असतील, पक्ष बदलले असतील, त्यांच्यावरही बरेच वेगवेगळे आरोप असतील पण आज ते ज्याप्रकारे हे पोर्शे प्रकरण लावून धरत आहेत त्याला तोड नाही.पक्षीय चश्म्यातून प्रत्येक गोष्ट बघणारी लोकं धंगेकर जे करत आहेत त्यालाही पक्षीयच रंग देतील.पण हे प्रकरण लावून धरल्याने इथून पुढं एखादी “बडे बाप की औलाद” गरिबांना गाडीखालून चिरडून टाकताना दहावेळा विचार करेल.
पक्षीय गणिताचा आणि व्यक्तिगत चॉईसचा विचार बाजूला ठेवून धंगेकर पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत.ते निवडून आले तर मला आनंदच होईल.आणि नाही निवडून आले तरी त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न असेच रस्त्यावरून मांडले तर त्यांच्यासाठी दोन शब्द लिहायला मी तरी मागेपुढे बघणार नाही.
एवढं जनआंदोलन उभारून रवींद्र धंगेकर हे ज्यांचे सभागृह सहकारी आहेत ते उदय सामंत म्हणतात “कोण धंगेकर? मी ओळखत नाही.” याआधीही पुण्यातून दुसऱ्याच्या आयत्या पीठावर रेघोट्या मारून आमदार झालेले चंपाही “Who is धंगेकर?” असे म्हटले होते आणि त्यानंतर कसब्यात भाजपसाठी सहानुभूतीची लाट असूनही भाजपचा उमेदवार याच धंगेकर यांच्याकडून पराभूत झाला होता.त्यामुळे काम करणारी लोक स्वतःची जागा स्वतः बनवतात यावर विश्वास बसला.
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली ऐशखोर लोकं दुसऱ्यांना तिरस्काराने ओळख विचारतात हेही तेवढेच खरे! आता धंगेकर यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी जनमताचा दबाव आणून दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखा जलद न्याय त्या दोन निष्पापांना मिळवून द्यावा हि त्यांच्याकडून माफक अपेक्षा.
थँक्यू धंगेकर!!!
रविकुमार सुभाषराव.