Newsprahar

‘बार-रूफटॉप-पब’ पूर्वीप्रमाणे रात्री दीड परेंत सुरु…मात्र हुक्क्यास बंदी…

न्यूज प्रहार ( पुणे प्रतिनिधी ) : ‘बार-रूफटॉप-पब’ रात्री दीड म्हणजे दीडलाच बंद करावे लागणार आहे. ग्राहकांना बाहेर पाडण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी देण्यात आला असून वेळेत या आस्थापना बंद करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हॉटेल-पब चालकांना केल्या आहेत.

यासोबतच रेस्टॉरंटला विनाकारण त्रास देण्यात येऊ नये असे आदेश देखील त्यांनी पोलिसांना दिले आहेत. ‘पब-बार-रूफटॉप’, रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. बुधवारी आस्थापना चालक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त (प्रशासन) अरविन्द चावरिया आदी उपस्थित होते. यावेळी शहारातील ‘पब-बार-रूफटॉप’ आणि रेस्टॉरंट चालक देखील उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी शहरातील ‘नाईटलाईफ’वर लगाम लावण्यास सुरुवात केली.

त्यानुसार, सीआरपीसी कलम १४४ लावण्यात आले आहे. नागरिकांकडून याबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. अनेक नागरिकांनी पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत देखील केले आहे. रेस्टॉरंटसह ‘बार-रूफटॉप-पब’ करिता नियमावली देखील तयार करण्यात आलेली आहे. ही नियमावली पंधरा दिवसांसाठी लागू करण्यात आली आहे. नागरिकांकडून येणाऱ्या हरकती आणि सूचना यांचा विचार करून त्यावर अंतिम निर्णय घेऊन सुधारित आदेश काढला जाणार आहे. 

यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात या आस्थापना चालकांची बैठक घेण्यात आली. यामध्ये नियमावलीबाबत हरकती व सूचनांसह त्यांच्या अडीअडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने आयुक्तांनी नियमावलीत काही बदल करण्याचा देखील  निर्णय घेतला आहे.

‘पब-बार-रूफटॉप’ करिता रात्री दीडपर्यंतची मुदत आहे. मात्र, रेस्टॉरंटला रात्री अकरापर्यंतचीच मुदत आहे. त्यामुळे पोलीस रेस्टॉरंट बंद करण्याचा आग्रह करतात. रेस्टॉरंटबाबत नियमात शिथिलता देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तेव्हा, आयुक्तांनी रेस्टॉरंट्सला त्रास देऊ नये अशा सूचना पोलिसांना केल्या.