दौंड : केंद्र सरकारने दौंड रेल्वे जंक्शन या स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यास मंजूरी दिली आहे. एक एप्रिल २०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
रेल्वे बोर्डाचे सचिव अरूण नायर यांनी दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्यासंबंधी २१ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर केली आहे. दौंड – पुणे लोहमार्गावर पाटस (ता. दौंड) स्थानकाच्या आधी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची सुरू होते मात्र दौंड स्थानकाचा सोलापूर विभागात समावेश आहे.
दौंड-सोलापूर-वाडी आणि दौंड-नगर-अंकाई (ता. येवला, जि. नाशिक) पर्यंतच्या मार्गांचा सोलापूर रेल्वे विभागात समावेश आहे. तर दौंड रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या पुणे-दौंड-बारामती रेल्वे खंडाचा पुणे विभागात समावेश आहे. सध्या दौंड स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.
दौंडपासून सोलापूर रेल्वेस्थानकाचे अंतर १८७ किलोमीटर तर पुण्याचे अंतर अवघे ७५ किलोमीटर आहे. दौंड येथे सोलापूर विभागाचे काही उप विभागीय कार्यालये आहेत, परंतु अंतिम निर्णय सोलापूर विभागीय कार्यालयातील वरिष्ठ घेत असल्याने त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासकीय कामे जलद गतीने होण्यासाठी पुणे सोयीचे असल्याने दौंड रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी दशकापासून प्रलंबित होती.
प्रवासी आणि नागरिकांना प्रशासकीय, भौगोलिक, आर्थिकदृष्ट्या सोलापूर पेक्षा पुणे विभाग सोईचा असल्याने रेल्वे प्रशासनाने दौंडचा समावेश पुणे विभागात करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने केली होती. लोकसभेच्या अधिवेशनात यासंबंधी प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता.
दौंड-पुणे-दौंड दैनंदिन प्रवास करणारे हजारो प्रवासी, रेल्वेचे कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, मालवाहतूकदार, आदींना दौंडचा समावेश पुणे विभागात करण्यासंबंधी निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष आभार मानले आहेत.