Newsprahar

८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी बाजार समितीच्या पाण्याच्या टाकीतून वाया…

मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व खराब झाल्याने सुमारे ८ ते १० लाख लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. टाकीत पाणी जास्त असल्याने पाण्याचा प्रेशर जास्त होता. तब्बल दोन ते अडीच तास पाणी वाहत होते. यामुळे मार्केट यार्ड येथील शिवनेरी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.

गुरुवारी १२ च्या सुमारास अचानक टाकीचा व्हॉल्व मधून प्रचंड पाण्याची गळती सुरू झाली. टाकीत असलेले तब्बल सुमारे ८ ते १० लाख लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. यामुळे बाजार घटकांच्या पाणी पुरवठ्यावर काहीसा परिणाम झाला. त्यांनतर संध्याकाळपर्यंत व्हॉल्वची दुरुस्ती करत तळभागातील टाकीतील पाणी वरच्या टाकीत चढवून पाणीपुरवठा करण्यासाठी सुरुवात केली.

पुणे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयालगत पाण्याची टाकी उभारली आहे. टाकीत महापालिकेच्या लाईन वरून पाणी घेतले जाते. या पाण्याच्या टाकीद्वारे संपूर्ण गुळ भुसार विभाग, फुलांचा बाजार, फळे व भाजीपाला, कांदा-बटाटा, पान व केळी बाजारात पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो.

सुमारे वर्ष ते दीड वर्षापूर्वीच या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले. या टाकीसाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च आला आहे. पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता वरच्या भागात २० लाख लिटर आणि तळभागात २० लाख लिटर अशी एकूण ४० लाख लिटर इतकी आहे. जून महिन्यापासून पाण्याच्या टाकीचा वापर सुरू केला आहे.

पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्वची दुरुस्ती करत असताना अचानक व्हॉल्व तुटल्याने ही पाणी गळती झाली आहे. वेळीच यंत्रणा कामाला लावून व्हॉल्व दुरुस्तीचे सायंकाळपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.